माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ (१) "क" व "ख"
या कलमांमध्ये सार्वजनिक प्राधिकरणाने हा कायदा अमलात आल्यापासून एकशे वीस दिवसांच्या आत सदर कलमाची अंमलबजावणी करणे बंधनकारक होते.बहुतांशी कार्यालयामध्ये कलम ४ अंमलबजावणी होत नाही. असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. परंतु सदर कायद्याची अंमलबजावणी होताना आजही सार्वजनिक प्राधिकरणे टाळाटाळ करीत आहेत…….
प्रशासन कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करीत आहे. परंतु या सगळ्यांमध्ये नागरिक आपला हक्क बजावण्या पासून कुठेतरी कमी पडत आहेत. मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यांमध्ये मनमर्जी कारभार चालण्यास वाव मिळत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही…
सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कलम ४ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भ्रष्टाचार करणे कठीण होईल, नागरिकांना देखील माहिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याची गरज लागणार नाही. सार्वजनिक प्राधिकरण यांनी स्वतःहून माहिती प्रसिद्ध करावयाचे आहे. तर नेमकी कोणती माहिती आणि काय प्रसिद्ध करावे याचा तपशील सांगणारे कलम म्हणजेच माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४(१) "क" व "ख" ….
कलम ४ (१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण ( सर्व शासकीय कार्यालये )
(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेल्या माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरूपात सर्व अभिलेख योग्यरीतीने सूचिबद्ध करील आणि त्याची निर्देश सूची तयार करील आणि ज्यांची संगणकीकरण करणे योग्य आहे अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विविध प्रणालींमध्ये नेटवर्क मार्फत ते जोडले जात आहेत याची खातरजमा करील.
(ख) हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून १२० दिवसांच्या आत,
- (एक) आपली रचना कार्य व कर्तव्ये यांचा तपशील.
- (दोन) आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य;
- (तीन)निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती,तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली.
- (चार) स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरविण्यात आलेली मानके;
- (पाच) त्यांच्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांचीकार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम ,विनियम ,सूचना नियमपुस्तिका आणि अभिलेख;
- (सहा) त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण;
- (सात)आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील;
- (आठ)आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण; आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण;
- (नऊ) आपल्या अधिकार्यांची आणि कर्मचार्यांची निर्देशिका;
- (दहा) आपल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मिळणारे मासिक वेतन; तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पद्धती;
- (आकार) सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरीत केलेल्या रकमांचा अहवाल;
- (बारा)अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील;
- (तेरा) ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील;
- (चौदा)इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील;
- (पंधरा)माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील;
- (सोळा) जनमाहिती अधिकार्यांची नावे पदनामे आणि इतर तपशील;
- (सतरा) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती;
प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्यावत करील;
या कलमानुसार सार्वजनिक प्राधिकरणामध्ये माहिती प्रसारित करणे याचा अर्थ 'सूचना फलक वृत्तपत्रे जाहीर घोषणा प्रसारमाध्यमांकडून ध्वनिक्षेपण इंटनेटद्वारे किंवा कोणत्याही अन्य मार्गाने लोकांना माहिती करून देणे किंवा कळविणे किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यालयाची पाहणी करू देणे ,असा आहे.